सदा मित्रांचा 'टोळक्यात' बसून 'गजाली' करत होता तेवढ्यात रस्त्यावर हवालदार दिसला. 'भाजीबाजारात' हवालदार दिसणे ही काही अपूर्व घटना नव्हती त्यामुळे सर्वानी त्याला पाहिलं असलं तरी गजालींचा विषय तसाच चालू राहिला. काल रात्री झालेल्या मारामारीचा. सदा कोणाचीतरी कशी खेचली हे रंगवून सांगत होता, आणि बाकी मंडळी खिदळत होती. 'अरे, मियां तुका सांगतय, तो परत माझ्या वाटेक कदी येवचो नाय. माका शिकवता. राग इलो तर बापाशीक बापूस म्हणाचय नाय मी. काय समाजला?'
खरं सांगायचं तर सदा हा आमच्या गावातला एक बेकार तरूण. शाळेच्या दिवसात शाळेपेक्षा इतर गोष्टीमध्ये लक्ष असायचं त्याचं. पायात साधं बाटाचं स्लीपर घालून माडावर चढायचा तो. तो शाळेत असेपर्यंत शाळेच्या आवारातल्या माडावरचे 'बोंडे' कधी नाहीसे होत कळत नसे. कसा बसा ढकलत ढकलत पाचवी पर्यंत शाळेत गेल्यानंतर सदाने शाळा सोडली आणि तो S.T. स्टँडवर दिवसभर फिरायला मोकळा झाला. उन्हाळ्यात कोकणात सुट्टीसाठी येणार्या चाकरमान्याना परत जाताना मुम्बई गाड्यांवर शीटा मिळवून देणे, प्रायवेट गाड्यांची तिकिटे ब्लॅक करून तिकिटामागे पाच धा रूपये कमावणे, दुबईहून आलेल्या लोकांची घड्याळं, टेप इत्यादी सामान ब्लॅकमध्ये विकून देणे, असे बरेच उद्योग तो करत असे. (ब्लॅकच्या धंद्यामुळे त्याला सदा "काळे" म्हणून ओळखत असत.) कसंबसं पोट भरेल एवढे पैसे त्याला सुटत असत. बाकी वेळ मित्रांबरोबर बसून मोठ - मोठ्या गजाली करणे, मोठी मोठी स्वप्नं बघणे यातच सदाचं बालपण कधी गेलं ते त्यालाही कळलं नाही. थोडक्यात सदाच्या आयुष्यात सांगण्या सारखं काही विशेष नव्हतं. पण हल्ली मात्र सदामध्ये बराच फरक दिसून येत होता. पूर्वी जे लोक त्याला काडीचीही किंमत द्यायचे नाहीत ते हल्ली 'कसां काय सदा ?' असं विचारू लागले होते. 'चाय'च्या हाटेलाचा मालक पूर्वी चहा देण्याआधी 'आमी उदारी बंद केली हा' असं बीनधास्तपणे सांगत असे तो आता काही न बोलता चूपचाप 'उधारी' करू देत होता. सदा सारख्या इतर अनेक तरूणांच्या टोळक्यामधे का असेना सदाला 'भाव' होता. कोकणात गेल्या काही वर्षात 'श्रीसेने'चा प्रभाव वाढत होता. पूर्वी चाकरमान्याच्या 'खोली' आणि 'चाळी'तून आलेली 'श्रीसेना' हळूहळू आपले पाय त्यांच्या घरात म्हणजे 'कोकणात' पसरत होती. गावा गावात 'श्रीसेने'च्या कचेर्या उघडत होत्या. पूर्वी 'रिकामटवळी' फिरणारी बरीच तरूण पोरं आता 'श्रीसेने'त सामील झाली होती. सदा हा असाच एक तरूण. पोटापाण्याचा काही उद्योग मिळेल या आशेने सेनेच्या कचेरीत पोहोचला. आणि त्यांचे जाहीरातींचे फलक रंगवता रंगवता एका 'निवडणूक' हंगामात एकदम 'लीडर' झाला. खरं तर तो 'लीडर' आहे असं त्याला कोणी सांगितलं नव्हतं. 'श्रीसेने'ची गावची कचेरी सोडली तर त्याला बाहेर कोणी ओळखला नसता. पण ऐन निवडणूकीच्या धामधूमीत काही पैसे खिशात खुळखुळायला लागले होते. चार दोन स्थानिक आणि एका दोघा राज्यस्थरावरच्या पुढार्यांबरोबर प्रचाराला जायला मिळाल्यामुळे त्याचा 'भाव' वधारला होता. प्रचारा - निमित्त पंचक्रोशीत कुढे पोस्टर लाव, कुठे हँडबिलं वाट अशी फुटकळ काम तो अभिमानाने करत होता. निवडणूक आली आणि गेली सुध्दा. पण सदाच्या अंगातून 'श्रीसेना' उतरली नाही. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे झालेल्या संपात काही पुढार्यानी 'रस्तारोको' आंदोलन केलं तेव्हा लागणार्या गर्दीत सदा होताच. त्यात कोणातरी पुढार्याला पाणी देताना सदाचा फोटो पेपरात आला. त्यामुळे सदा स्वतःला 'लीडर' समजायला लागला. आंदोलनात रस्ता अडवणार्या पुढार्याना पोलिसानी अटक केली, तेव्हा सदाने 'झाळकी'त दडी मारून मागच्या मागे पळ काढला हे गावातल्या पोरा - पोराना देखील माहित होतं, पण सदा मात्र 'काय छाती त्या इंस्पेक्टराची माका अटक करूची, मी तोंडार थुकतय त्या xxxxx च्या' असे लोकाना ऐकवत फिरत होता. लोकही त्याला 'तुजी काय बुवा, घसण आसा बाळ्याबरोबर' असं चढवत होते. पण मागून मात्र 'कोण, सदगो, मेलो झाळकेत दडान पाटच्या पाटी पळालो म्हणून सुटलो हां, आमका सांगता गोष्टी. पोलिसानी सगळ्यांच्या समोर कानफाटात मारल्यानी तेच्या' अशी बातमी गावात पसरली. खरं तर 'रस्तारोको' मध्ये अगदी थोड्या लोकानी भाग घेतला होता पण आता सगळे एकामेकाना 'मी थंयच कसो उभो होतय, स्वतःच्या डोळ्यानी कसां बघलय' हे ऐकवत होते. हे पण सदाला माहित नव्हते असे नाही. लोकानी तोंडावर केलेली प्रशंसा ऐकून सदाची छाती आणि 'लीडरगिरी' अजून फुगायला लागली. पूर्वी 'सदगो' म्हणून ओळखला जाणारा सदा आता 'लीडर सदा' म्हणून ओळखला जात होता.
त्यामुळे येणार्या हवालदाराकडे एक कटाक्ष टाकत सदाने आपली गोष्ट पुढे चालू ठेवली. पण हवालदार काही कच्चा नव्हता.
त्याने आल्या आल्या डाफरायला सुरुवात केली. 'तुमच्यात सदानंद साटम कोण आहे ?'
'सदानंद साटम कोन सदानंद साटम?' कुणी तरी उत्तर दिले. सदाचे पूर्ण नाव काय ते सदालाही पटकन आठवले नसते.
'हां, म्हणजे सदा, सदा "काळे", हो काय हंय बसलोहा'
'मी मी सदा, काय काम आहे ?', सदाने लगेच टेचात विचारले.
'चला, तुम्हाला इन्स्पेक्टरसाहेबानी बोलावलय' हवालदार पुढे होत म्हणाला.
'कित्याला म्हन्जे आपलं कशाला त्यांचं माझ्याकडे काय काम हाये ?' सदाची गुर्मी.
'चल, पोलीस ठाण्यावर मग सांगतो', हवालदाराला असली गुर्मी ऐकायची सवय नव्हती.
'नाय येत, काय करशील ?' आता सगळ्याना सदा काय करतो याची उत्कंठा लागली. सदाला ही जमाव बघून जोर चढला. सदा एकदम मातृभाषेवर आला 'काय करशीत बोल?'
'चूपचाप माझ्या बरोबर चल' ,म्हणत म्हणत हवालदार पुढे होऊन त्याची कॉलर धरणार तेवढ्यात
'ए, आंगाक हात लावायचो नाय काय समाजलस, Lady Police आल्याशिवाय हात लावायला देणार नाही'. 'काय ?', पुढे होणारा हवालदार देखील एक क्षण बावचळला, 'काय म्हणालास ?'
' Lady Police आल्याशिवाय हात लावायला देणार नाही'. जमलेली मंडळी ही नवीच गम्मत ऐकून खदा खदा हसू लागली. हवालदाराला देखील हसू आवरेना. पण त्याला त्याचं काम करणं भाग होतं. भाजीबाजारात आता बघ्यांची गर्दी वाढायला लागली. सदाची दादागिरी आणि आजूबाजूची गर्दी बघून हवालदाराने माघार घेतली. सदाला अजूच चेव चढला.
पोलीस निघून गेल्यावर तर त्याने शिव्या आणि वल्गनांचा पाऊस पाडला. बाकी लोक सदाला अजून चढवत होते आणि सदा पेटत चालला होता. सदाचा हा जोर ओसरतो न ओसरतो तोच पोलिसांची जीप भाजीबाजारात आली. जीप मधून एक इन्स्पेक्टर आणि मघाचा हवालदार उतरले. सदा आणि त्याचे काही मित्र अजूनही मघाची जीत साजरी करत होते.
'सदा साटम कोण आहे?' इन्स्पेक्टरने आपल्या पोलीसी आवाजात विचारले. हवालदाराने लगेच सदाकडे बोट दाखवले.
'तू सदा काय ?'
'मी...मी सदा, काय काम आसा?'
'माज आला काय रे?' म्हणत इन्स्पेक्टरने सरळ त्याच्या कॉलर हात घातला.
'ए, आंगाला हात लावायचा काम नाय'. इन्स्पेक्टरला असली भाषा ऐकायची सवय नव्हती. त्याने कॉलरसकट सदाला उचलला. ' Lady Police आल्याशिवाय अंगाला हात लावायचा नाही...', सदा वळवळत म्हणाला. तो पुढे काही बोलला असता पण तेवढ्यात इन्स्पेक्टरने मारलेली सणसणीत थप्पड भाजीबाजारात सगळ्याना ऐकू आली. हे प्रकरण सिरीयस दिसतय हे लक्षात आल्यावर बहुतेकानी काढता पाय घेतला. मांजरीच्या पिल्लासारखं मानगुटीला धरून पोलिसानी त्याला जीपमध्ये कधी टाकला आणि जीप पोलिसठाण्याला कधी गेली हे कुणालाच कळलं नाही.
दोन चार दिवसानी सदा सुटला आणि पुन्हा गावात फिरायला लागला. आता पुन्हा त्याच्या मित्राना चघळायला एक नवीन विषय सापडला. टोळकं जमलं आणि नेहमी प्रमाणे चर्चा सूरू झाली. सदा नेहमीप्रमाणे आपल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकवत बसला होता. पोलिसानी सदाला चांगलाच चोपला आहे हे सदाच्या सुजलेल्या थोबाडावर दिसतच होते. मित्रानी पोलिसांचा विषय काढायचा नाही असे ठरवले असले तरी त्याना राहवेना. मग कुणी तरी सुरूवात केलीच.
'सदा, ती... पोलिसांची भानगड काय ?'
'काय नाय रे, ती रात्री मारामारी झाली ती भानगड'
'पण तुका कित्याक मारल्यानी ?'
'इन्स्पेक्टराक राग इलो. मी Lady Police मागलय म्हणून. तेचा कपाळ फिरलेलां. मेलो हसा आणि माज्या कानपाटात मारी परत कानपाटात मारी आणि हसां, मेल्यान मारून मारून मजो जीव काडल्यान पण माका बोलाक देयना मारे. नायतर मी तेका बरोब्बर सुनावला असता.' यावर जमलेल्या सगळ्या मित्रानी सदाच्या भावनांची कदर न करता हसून घेतले.
मग कुणीतरी हळूच विचारले, 'पण, सदग्या तुका मेल्या Lady Police कित्याक ?'
'कित्याक म्हन्जे, मी 'लीडर' आसय 'श्रीसेनेचो', काय समाजलस' 'अरे होय, तू लीडर आसस. पण म्हणून काय झालां ?'
'अरे, परवाच्या संपात ती विमलताई कुमठेकर नाय इलेली. ती मोठ्ठी लीडर आसा, तिना पण सांगलेन Lady Police होई म्हणून'
'अरे मेल्या तिचा म्हणणा बरोबर पण तू तर बापयो आसास मारे तुका Lady Police म्हणजे काय ता समाजता?'
'मगे, मोठ्या लीडराक मोठी पोलीस नको ?'
'अरे मेल्या सदग्या, lady police म्हणजे मोठ्ठी पोलीस न्हय, Lady म्हणजे बायलमाणूस' यावर हास्याची ही कारंजी उसळली आणि सदाला आपला गाढवपणा कबूल करावा लागला नाही.
Wednesday, November 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment